DCM Sunetra Pawar: बीडमध्ये निनावी पत्राचा भडका अजूनही शांत झालेला नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा करणाऱ्या त्या पत्राने राज्यभरात खळबळ उडवली. पण पत्र पाठवणारा अद्याप अज्ञातच आहे. कायद्यात ठोस तरतूद नसल्यामुळे तपास मर्यादित असल्याची कबुली पोलिसांनी दिली आहे. याच मुद्द्यावर आता बीड कृती समिती आक्रमक झालीय. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
काय नेमकं प्रकरण?
नाशिकच्या अशोक खरात प्रकरणानंतर बीडमधून समोर आलेल्या एका निनावी पत्राने नव्या वादाला तोंड फोडलं. एसआयटीकडे दिल्याची माहिती असलेलं हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. काही नेत्यांनी सखोल चौकशीची मागणी केली, मात्र पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी निनावी पत्रांवर कारवाईसाठी कायद्यात ठोस तरतूद नसल्याचं स्पष्ट केलं. या भूमिकेमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालं. दरम्यान, बीड कृती समिती आक्रमक झाली असून, जिल्ह्याची बदनामी करण्याचा डाव असल्याचा आरोप करत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची जोरदार मागणी केली आहे.
कडक कारवाईची मागणी
राज्यात कुठलीही घटना घडली की आधी “बीड कनेक्शन” शोधलं जातं, असा संताप आता उफाळून आला आहे. बीडची जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याचा आरोप करत कृती समिती आक्रमक झाली आहे. नाशिकच्या खरात प्रकरणातही बीडचा संबंध जोडत एक निनावी पत्र सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलं. “हे पत्र नेमकं कोणी लिहिलं, कोण पसरवतंय?” याचा सखोल तपास करून दोषींवर गुन्हे दाखल करा, अशी ठाम मागणी करण्यात आली. पोलिस अधीक्षक आणि आयजी यांना निवेदन देत बीडची प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केलीय.
पोलीस काय दखल घेणार?
जिल्ह्यात खून दरोडा मारहाण या घटना ताज्या असतानाच आता एका नव्या प्रकरणात देखील बीड कनेक्शन शोधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय. यामुळे या नाही त्या कारणाने चर्चेत असलेलं बीड पुन्हा एकदा राज्याच्या पटलावरती चर्च स्थानी आलंय. मात्र यांनी निनावी पत्रामुळे बीडमध्ये मोठी खळबळ उडालीय. आता बीड कृती समितीने दिलेल्या निवेदनाची पोलीस अधीक्षक काय दखल घेतात आणि कशा पद्धतीने कारवाई करतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
निष्पक्ष तपास होणं अत्यावश्यक
एकूणच निनावी पत्रामुळे निर्माण झालेलं हे वादळ अजूनही शांत झालेलं नाही. पत्राचा उगम, त्यामागील हेतू आणि त्यातून उभ्या राहिलेल्या शंका, या सगळ्यांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे. बीडची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप होत असताना, सत्य बाहेर आणण्यासाठी सखोल आणि निष्पक्ष तपास होणं अत्यावश्यक आहे. आता पोलिस यंत्रणा या प्रकरणाकडे किती गांभीर्याने पाहते आणि पुढील कारवाई काय करते, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.