सोनू भिडे नाशिक: मोबाईल हि सर्वांची गरज झाली आहे. लहान आणि मोठ्यांच्या हातात सध्या मोबाईल दिसून येतो. लहान मुले जेवण करत नाही, अभ्यास करत नाही, चिडचिड जास्त करतात म्हणून पालकच मुलांना मोबाईल देऊन गप्प करतात. मात्र यामुळे मुलांना मोबाईलचे व्यसन लागले आहे. आता या व्यसनाचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. गेम खेळण्यासाठी मोबाईल न दिल्याने कुठे मुलाने आईचा खून केलाय तर कुठे स्वतः मुलाने आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. 

नाशिक जिल्ह्यातही असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. आईने गेम खेळण्यासाठी मोबाईल दिला नाही म्हणून १२ वर्षीय ऋषिकेशने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

का केली आत्महत्या

नाशिक औरंगाबाद महामार्गावर नैताळे गावाजवळ असलेल्या आदिवासी भागात जालिंदर सुराशे आणि पत्नी भारती सुरासे त्यांच्या दोघे मुलांसह राहतात. सुराशे यांचा मोठा मुलगा सहावीला तर छोटा मुलगा तिसरीत शिकतो. आई वडील मोलमजुरी करून कुटुंब चालवतात. 
रविवारी (१४ ऑगस्ट) शाळेला सुट्टी होती. शाळेत मिळालेला होमवर्क पूर्ण करण्यास आईने मोठा मुलगा ऋषिकेशला सांगितले. मात्र गेम खेळण्यासाठी मोबाईल देण्याचा हट्ट त्याने आई कडे केला. अगोदर अभ्यास कर मग मोबाईल देईल असे सांगितले. याचा राग ऋषिकेशच्या मनात होता. आई कामानिमित्त बाजारात गेली असता काही वेळाने घरी आली. ऋषिकेश समोर कुठेही दिसला नाही म्हणून त्यांनी शेजारील खोलीत डोकाऊन बघितलं तर ऋषिकेशने ओढणीच्या सहाय्याने आत्महत्या केल्याचे दिसल्याने त्यांनी हंबरडाच फोडला.

मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकतात हे परिणाम

लहान वयात मोबाईलचा अतिवापर केल्याने शारीरिक आणि मानसिक व्याधी होऊ शकतात. मोबाईल वापरतांना मुले चुकीच्या पद्धतीने बसतात याचा परिणाम त्यांच्या हात, पाठ आणि मानेवर होतो. मोबाईलच्या स्क्रीनमुळे डोळे सुद्धा खराब होण्याची शक्यता असते. मोबाईल जास्त वापरणाऱ्या मुलांमध्ये थकवा, ताण आणि तणाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. काही प्रकरणांत गंभीर मानसिक आजार निर्माण झाल्याचे सुद्धा दिसून आले आहे. मोबाईलच्या दुनियेत रमल्याने खऱ्या आयुष्यातले मित्र आणि  खेळ याच्या पासून मुले दूर जाऊ लागतात. अमेरिकेतील काही  संशोधन अहवालात मोबाईलच्या अतिवापरामुळे ब्रेन कॅन्सर होण्याचा धोका  असल्याचे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत.  

मुलांना मोबाईल पासुन दूर ठेवण्यासाठी हे करा 

कुटुंबियांनी लहान मुलांसोबत गप्पा मारणे, खेळत राहणे, वेळ घालवणे गरजेचे आहे. मुलांना प्रेमाने सांगून घरातील काम सांगून व्यस्त ठेवा. सर्वात चांगला उपाय म्हणजे त्यांना मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रवृत्त करा, त्याचा शरीरावर  सकारात्मक परिणाम होऊन प्रतिकार क्षमता वाढीस लागेल. समवयस्क मुलांसोबत खेळल्याने स्पर्धात्मक क्षमता निर्माण होऊन सकारात्मक विचारसरणी निर्माण होते. त्यात त्यांची ओढ निर्माण होऊन  मुले मोबाईलपासून दूर होण्यास मदत होते





Source link