सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : आरोग्याबाबत (Health) तुम्हाला सजग करणारी महत्वपूर्ण बातमी. गायी-म्हशीचं (Cow and Buffalo milk) दूध आपण घरात सर्रासपणे वापरतो. मात्र हे दूध तुमच्या आरोग्यासाठी हानीकारकही ठरू शकतं. कारण जनावरांच्या दूधवाढीसाठी केमिकल इंजेक्शनचा वापर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. (use of chemical injection for milk increase in cows and buffaloes fda seized 53 lakh rupees medicins)

मोठ-मोठ्या बॉक्समध्ये असलेली ही औषधं, हा कुठल्या हॉस्पिटलमधील औषधांचा साठा नाही, तर ही आहेत ऑक्सीटोसीन इंजेक्शन्स. तसं पाहिलं तर ही औषधं महिलांच्या डिलिव्हरीसाठी वापरली जातात. मात्र काही माफियांनी याचा वापर थेट दुभत्या जनावरांवर सुरू केलाय. गायी-म्हशींच्या दूध वाढीसाठी या औषधांचा सर्रासपणे बेकायदा वापर होतोय.

अंमली पदार्थ विरोधी पथक आणि अन्न औषध प्रशासनानं याची माहिती मिळताच मोठी कारवाई करत पुण्यातून तब्बल 53 लाखांची औषधं जप्त केलीयेत. यामागे पश्चिम बंगालमधील टोळी असून आतापर्यंत सहा जणांना अटकही करण्यात आलीय.

ऑक्सिटोसीन हे इंजेक्शन महिलांच्या डिलिव्हरीवेळी वापरलं जातं. यामुळे प्रसूती वेदना कमी होतात. मात्र हे इंजेक्शन गायी-म्हशींना दिल्यास त्या जास्त दूध देतात. या इंजेक्शनच्या वापरामुळे जनावरांनी दिलेलं दूध मानवी शरीरासाठी घातक मानलं जातं. मात्र, त्याचा परिणाम मानवी शरीरावर होतो. ते दूध प्यायल्यास अशक्तपणा, दृष्टीविकार, पोटाचे आजार, नवजात बालकांना कावीळ, गर्भवती महिलेला रक्तस्त्राव, अनैसर्गिक गर्भपात, श्वसनाचे विकार तसच त्वचेचे विकार असे गंभीर विकार होण्याची शक्यता आहे.

मात्र हे सगळे नियम पायदळी तुडवून पश्चिम बंगालची टोळी पुण्यात या केमिकलयुक्त इंजेक्शनची निर्मीती आणि विक्री करत होती. सकस आहार म्हणून दुधाकडे पाहिलं जातं. मात्र काही माफियांनी पैसे कमावण्याच्या नादात आता दुधालाही बदनाम करण्याचा घाट घातलाय. अशा समाजकंटकांना कडक शिक्षा व्हायलाच हवी.





Source link