Pune Lohagad Ketan Agrawal Death Case Siya Goyal  : पुण्यातील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट आला आहे.  लोहगडावर  फोटोची पोज देताना केतन अग्रवाल घसरुन दरीत पडला नसून त्याला ढकलून दिल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली. होणाऱ्या पत्नीसह तिच्या प्रियकराला याप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक ट्विस्ट आला आहे. अटकेनंतर सियाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. केतनचा मृत्यू झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिने सोशल मिडियावर काही व्हिडिओ शेअर केले होते. सियाने केतन साठी अत्यंत भावनिक पोस्ट शेअर केली होती. 

केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अत्यंत धक्कादायक आणि थरारक खुलासा

लोणावळ्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावरून पडून व्यावसायिक केतन अग्रवाल या तरुणाचा झालेल्या मृत्यूप्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक खुलासा समोर आला आहे. सुरुवातीला ट्रेकिंग दरम्यान झालेला अपघात वाटणारी ही घटना प्रत्यक्षात एक पूर्वनियोजित कट रचून केलेली हत्या असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. केतनच्या होणाऱ्या पत्नीनेच आपल्या मित्राच्या मदतीने त्याला खोल दरीत ढकलून दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून, या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केतनच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी सियाने शेअर केलेला व्हिडिओ अटकेनंतर व्हायरल

सियाच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे आणखी धक्कादायक वळण मिळाले आहे. केतनच्या मृत्यूच्या बरोबर एक महिना आधी, म्हणजेच 18 मे रोजी सियाने इन्स्टाग्रामवर एक बर्थडे काउंटडाउन स्टोरी शेअर केली होती, ज्यामध्ये केतनने तिला खुश करण्यासाठी केलेले विशेष प्रयत्न आणि दोघांमधील अथांग प्रेम दिसत होते.  19 जूनला सियाचा वाढदिवस होता. त्याच्या एक दिवस आधी केतनचा मृत्यू झाला.  “तू माझ्या वाढदिवशी मला सोडून गेलास, आपण लग्नाच्या इतके जवळ असताना हे का घडलं?” अशी पोस्ट सियाने केतनच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी शेअर केली. जगाला त्यांचे नाते आदर्श वाटत असतानाच पडद्यामागे मात्र एका निष्पाप जिवाचा बळी घेण्याचा भयानक कट शिजत होता, ज्यामुळे सध्या परिसरात खळबळ उडाली आहे. सियाने शेअर केलेल्या पोस्ट आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. 

केतन अग्रवालच्या नातेवाईंचे खळबळजनक आरोप

19 तारखेला वाढदिवस होता. त्याआधी काही मित्रांसह तिथं आपण सेलिब्रेशन करणार आहोत अस सियाने केतनला सांगितलं. केतन जाण्यासाठी नको म्हणत असताना, सियाने ऐकलं नाही. लोहगड ठिकाणी गेल्यास सियाने फोन करून सांगितलं, की तो खाली पडला आहे. 26 वर्षीय केतन त्या ठिकाणी का गेला? हा प्रश्न होता. पोलिसांच्या तपासात काही गोष्टी निष्पन्न झालं. हत्येचा कट असल्याचा संशय आला. सियाने बॉयफ्रेंड सोबत जाऊन हा प्लॅन केला होता. 19 फेब्रुवारी रोजी साखरपुढा झाला. 25 नोव्हेंबर रोजी लग्न होणार होत. सिया आम्हाला पसंत होती, तिला केतन पसंत होता. कधीच वेगळं काही मनात आलं नाही. काही कळलं असत तर आम्ही लग्न मोडलं असत. मार्च आणि एप्रिल मध्ये सियासोबत किरकोळ कारणावरून वारंवार वाद व्हायचे. आम्ही त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तिच्या वडिलांशी आम्ही बोललो नव्हतो, कारण फार मोठं काही झालं आहे अस वाटलं नाही. सिया, केतन सोबत पार्टी करत होती, व्यवस्थित राहत होती, म्हणून संशय आला नाही. केतन चा कट रचून हत्या केली आहे. जो कुणी सहभागी असेल त्याला कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केतनचे काका दिनेश अग्रवाल यांनी केली आहे. 

केतन अग्रवाल कोण होता?

मृत केतन अग्रवाल हा प्रसिद्ध व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा होता.  मार्केटयार्डातील मसाल्यांचे मोठे व्यापारी गोयल यांची कन्या सिया गोयल हिच्यासह केतनचे लग्न ठरले होते.  पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील या दोन मोठ्या व्यावसायिक कुटुंबांमधील हा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडणार होता. जयपूर येथे या ””बिग फॅट वेडिंग””चं भव्य आयोजन करण्यात आलं होतं. एवढंच नव्हे तर, लग्नाला जाणाऱ्या पाहुण्यांसाठी चक्क दोन विमानं देखील बूक करण्यात आली होती. मात्र, या भव्य लग्नाआधीच केतनचा असा धक्कादायक अंत झाला. 

सियाने केतनच्या हत्येता कट का रचला?

सिया गोयल हिला केतन अग्रवालसोबत लग्न करायचं नव्हतं. कुटुंबाच्या दबावामुळे किंवा अन्य कारणांमुळे हे लग्न ठरलं असलं तरी ते सियाला मान्य नव्हतं. त्यामुळे तिने केतनला आपल्या वाटेतून कायमचे हटवण्याचा एक भयानक कट रचला. या कृत्यात तिने आपल्या एका खास मित्राची मदत घेतली. ठरलेल्या प्लॅननुसार केतनला लोणावळ्याजवळील लोहगड किल्ल्यावर फिरण्याच्या बहाण्याने नेण्यात आले. तिथे योग्य संधी साधून, कोणालाही संशय येऊ नये अशा पद्धतीने सियाने आपल्या मित्राच्या मदतीने केतनला थेट खोल दरीत ढकलून दिले. या भीषण घटनेत केतनचा जागीच मृत्यू झाला. 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp