Bageshwar Baba Shivaji Maharaj Statement: बागेश्वरबाबा यांनी केलेल्या एका विधानानंतर चांगलंच वादंग पेटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत बागेश्वरबाबांनी केलेल्या विधानानंतर त्यांच्याविरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं आहे, तसंच राजकीय नेत्यांनी देखील बागेश्वरबाबांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. या वादानंतर बागेश्वरबाबांनी देखील माफी मागितली आहे. यादरम्यान बागेश्वरबाबांना ‘कोल्हापुरी चप्पल मारणाऱ्याला’ तब्बल 1 लाख 51 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. हे बक्षीस कोणी जाहीर केलं आहे जाणून घ्या. 

Add Zee News as a Preferred Source

धाराशिवमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या कथित वक्तव्यावरून संताप उसळला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वरबाबांविरोधात धाराशिवमध्ये शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. आंदोलकांनी बागेश्वरबाबा, संजय गायकवाड आणि भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत फोटोला जोडे मारो आंदोलन केलं. यावेळी बागेश्वरबाबांना ‘कोल्हापुरी चप्पल मारणाऱ्याला’ तब्बल 1 लाख 51 हजार रुपयांचे बक्षीस शिवप्रेमींनी जाहीर केलं आहे. 

 

दरम्यान, अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे राज्यातील वातावरण तापत असून प्रशासनाने याची गंभीर दखल घेण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. 

बागेश्वरबाबांविरोधात राज्यभरात आंदोलन

बागेश्वरबाबांनी छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात केलेल्या विधानानंतर चांगलंच राजकारण पेटलं आहे. सत्ताधारी-विरोधकांनी बागेश्वरबाबांच्या विधानाचा समाचार घेतल्यानंतर  त्यांच्याविरोधात अनेक ठिकाणी विरोधक आणि सामाजिक संघटनांकडून आंदोलन करण्यात आलं आहे. अमरावतीमध्ये काँग्रेसनं आंदोलन केलं, तर सोलापुरात संभाजी ब्रिगेडनं आंदोलन करत विधानाचा निषेध केला. नागपुरात संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ , जिजाऊ ब्रिगेड कडून बागेश्वर बाबांविरोधात आंदोलन करण्यात आलं. तर शिर्डीतही शिवप्रेमींनी बागेश्वरबाबांच्या विधानाचा निषेध करत आंदोलन केलं.

बागेश्वरबाबा नेमकं काय म्हणाले होते?

शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींच्या भेटीचा संदर्भ देताना बागेश्वरबाबांनी एक वक्तव्य केलं होतं, शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना राज्यकारभार सांभाळण्याची विनंती केली होती असा दावा बागेश्वरबाबांनी केला, शिवाजी महाराज युद्धानंतर थकले आणि त्यानंतर त्यांनी समर्थ रामदास स्वामींच्या चरणी मुकुंट ठेवला आणि राजपाट सांभाळण्याची विनंती केल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

सर्व पक्षांकडून टीका

काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनीही बागेश्वरबाबांच्या विधानावरून टीका केली आहे. वडेट्टीवारांनी बागेश्वरबाबांना भोंदू म्हटलं आहे. तसंच एक आवाहन करत विजय वडेट्टीवारांनी बक्षिसाची देखील घोषणा केली आगे. तर दुसरीकडे बागेश्वरबाबा यांच्या विधानाला पाठिंबा दिला नसून त्याचा निषेध केल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. 

खासदार अमोल कोल्हेंनी देखील बागेश्वर बाबा यांना सुनावलं आहे. उत्तरेतून येऊन चुकीच्या आणि अर्धवट माहितीच्या आधारे कोणी छत्रपती शिवाजी महाराज शिकवण्याचा प्रयत्न करू नये असं म्हणत खासदार कोल्हेंनी बागेश्वरबाबांवर टीकास्त्र डागलं आहे. याआधीही बागेश्वरबाबांनी संत तुकाराम महाराजांबाबत केलेल्या एका विधानानं वाद पेटला होता, त्यावेळी त्यांनी अपूर्ण माहितीच्या आधारेच वक्तव्य केल्यानं त्यांच्यावर माफी मागण्याची वेळ आली होती, मात्र आता महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवरायांबाबत केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp