Health News Maharashtra: महाराष्ट्रामध्ये एकीकडे उन्हामुळे वाढलेल्या तापमानाची चर्चा असतानाच राज्यातील आरोग्य व्यवस्थेला धक्का देणारी आकडेवारी समोर आली आहे. ही आकडेवारी एका आजारासंदर्भात असून राज्यातील 11 हजार गावांना याच पार्श्वभूमीवर हाय अलर्ट देण्यात आला आहे. मागील महिन्याभरामध्ये महाराष्ट्रात या आजाराचे तब्बल 6 हजार नवे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

Add Zee News as a Preferred Source

केंद्र सरकारच्या मोहिमेत समोर आली धक्कादायक माहिती

केंद्र सरकारने  देशाला क्षयरोगमुक्त (टीबीमुक्त) करण्यासाठी 100 दिवसांची विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेतून धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 24 मार्च 2026 पासून सुरू झालेल्या या मोहिमेच्या पहिल्या 35 दिवसांतच राज्यात 6 हजार 111 नवे क्षयरोगी आढळले आहेत. देशातील दीड लाख, तर एकट्या महाराष्ट्रातील 11 हजार 91 गावांना क्षयरोगाचा धोका आहे. क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सध्या ‘एआय’ आधारित व्हीएमटीबी टूलचा वापर केला जात आहे. या तंत्रज्ञानाद्वारे राज्यातील 11 हजार 91 गावे ‘हाय रिस्क’ म्हणून निवडली आहेत.

कोणत्या जिल्ह्यात किती हाय रिस्क गावे?

यवतमाळ 539, अमरावती 504, नाशिक 488, रायगड 488, नागपूर 482, पुणे 479, चंद्रपूर 467, सातारा 442, गडचिरोली 433, नांदेड 404, अहिल्यानगर 401, रत्नागिरी 388, जळगाव 383, बुलढाणा 364, वर्धा 353, बीड 344, छत्रपती संभाजीनगर 339, कोल्हापूर 310, सोलापूर 291, अकोला 249, जालना 242, गोंदिया 239, लातूर 238, नंदुरबार 238, पालघर 231, भंडारा 226, परभणी 212, ठाणे 212, वाशिम 198, सिंधुदुर्ग 189, धाराशिव 185, सांगली 184, हिंगोली 178, धुळे 171

‘हाय रिस्क’ गावे कोणत्या आधारावर ठरवण्यात आली?

भौगोलिक स्थिती : झाडे, प्रदूषण आणि जलाशयांची स्थितीही लक्षात घेण्यात आली.

आरोग्य स्थिती : कुपोषण, लसीकरणाची व्याप्ती, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कर्करोग रुग्णांची संख्या हे निकष लावण्यात आले.

जीवनशैली : दारू आणि तंबाखूचे सेवन करणारे लोक, दाट लोकवस्ती आणि कामाच्या ठिकाणाचा डेटा गोळा करण्यात आला.

या आजाराची 4 प्रमुख लक्षणं कोणती?

सततचा खोकला- 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकणारा खोकला हे टीबीचे मुख्य लक्षण आहे. कधीकधी खोकल्यातून रक्त येणे किंवा थुंकी येण्यासारखे प्रकारही घडतात.

रात्रीचा घाम- झोपेत भरपूर घाम येणे, कपडे भिजणे हे सुद्धा टीबीचे लक्षण आहे.

वजन कमी होणे- कारण नसताना अचानक वजन कमी होणेसुद्धा टीबीच्या प्रमुख लक्षणांपैकी एक आहे.

ताप- 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ येणारा तापसुद्धा टीबी असल्याचं लक्षण आहे. सामान्यतः असा ताप संध्याकाळी येतो.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp