Ratnagiri News : यंदाच्या वर्षी मान्सून सरासरीहून तुलनेनं कमी असेल असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, सध्या पूर्वमोसमी पावसानं कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात थैमान घातलं आहे. कोकणातील रत्नागिरीत याचा परिणाम आंबा आणि काजू पिकांवरही होताना दिसत आहे. याचसंदर्भात आंबा उत्पादकांच्या हिताच्या अनुषंगानं काही निर्णय घेण्यात आले आहेत. जिथं 72 तासांचं गणित लागू असेल.
काय आहे निर्णय?
रत्नागिरीत वाऱ्यांचा वेग वाढून आंबा पिकाचं नुकसान झाल्यास बागायतदारांना मिळणार नुकसानभरपाई मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र यासाठी एक अट लागू असेल. संबंधित शेतकऱ्यांनी 72 तासांच्या आत विमाकंपनीकडे किंवा कृषी विभागाकडे तक्रार दाखल करणं अत्यावश्यक असेल. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी यासंदर्भातील माहिती दिली.
रत्नागिरीत निसर्ग रुसला…
रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारी निसर्गाचं रौद्र रूप पाहायला मिळालं. दुपारनंतर आलेल्या अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने दापोली तालुक्याला अक्षरशः झोडपून काढलं. या वादळाचा वेग इतका प्रचंड होता की, अनेक कुटुंबांची घरं कोसळली, गुरांचे गोठेही जमीनदोस्त झाले. अचानक आलेल्या या संकटामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचं मोठं नुकसान झालं. ज्यामुळं हवामानाचं हे रुप पाहता इथं भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
#रत्नागिरीत वाऱ्यांचा वेग वाढून आंबा पिकाचं नुकसान झाल्यास बागायतदारांना मिळणार नुकसानभरपाई. मात्र, संबंधित शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत विमाकंपनीकडे किंवा कृषी विभागाकडे तक्रार दाखल करणं अत्यावश्यक आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी दिली.#Farmers pic.twitter.com/9elABWiQAm
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) April 23, 2026
गुरुवारी रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण, संगमेश्वर तालुक्यात विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस बरसला, मेघगजनेसह जोरदार पावसाच्या सरींमुळं मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक मंदावली. ज्यामुळं या भागासाठी हवामान विभागाचा अवकाळी पावसाचा अंदाज खरा ठरला. जिथं दुपारनंतर अवकाळी पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, इथं पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
अवकाळी पावसामुळे एप्रिल महिन्यातील आंबा पीक धोक्यात
तळकोकणात अवकाळी पावसामुळे बागायतदार हवालदिल झालेत. मागील काही दिवस अवकाळी पाऊस रिपरिप स्वरूपाचा होता. कुडाळ तालुक्यातील माणगाव भागात चक्क गारांचा पाऊस पाहायला मिळाला. या अवकाळी पावसात कोसणाऱ्या गारामुळे हवेत काही काळ गारवा निर्माण झाला होता. मात्र दुसऱ्या सत्रात चांगला आंबा मिळेल या प्रतीक्षेत आलेल्या बागायतदारांना मात्र धक्का बसलाय. तळकोकणात मागील तीन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला होता.