Dr Shirish Valsangkar suicide case : न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या केल्यानंतर साऱ्यांनाच धक्का बसला. त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? त्यांना कोणी यासाठी प्रवृत्त केले का? यासंदर्भात पोलिस तपास वेगाने सुरु आहे. आता या प्रकरणी एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर येतेय. डॉ. वळसंगकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसळे-माने हिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकर यांनी एक चिट्ठी लिहलेली होती. यामध्ये मनीषा मुसळे-माने हिच्यामुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी केला.
रात्री 10 च्या सुमारास पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून रात्रीच न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपी महिलेला अटकही करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
वैद्यकिय क्षेत्रात नामवंत न्युरोसर्जन अशी डॉ. शिरीष वळसंगकर यांची ओळख होती. ते सोलापुरातील पहिले न्युरोलॉजिस्ट होते. फक्त सोलापूर, महाराष्ट्रचं नाही तर जगभरात त्यांनी विविध रुग्णालयात त्यांनी वैद्यकीय सेवा बजावली आहे. ज्या हॉस्पिटलमध्ये डॉ. शिरीष वळसंगकर यांनी हजारो रुग्णांवर उपचार केलं त्यांच्या त्याचं रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. मेंदूवरील विविध आणि अत्याधुनिक उपचारांसाठी त्यांनी इथं अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असं रुग्णालय सुरू केलं होतं. न्यूरोलॉजी क्षेत्रात त्यांनी दिलेलं भरीव योगदान अनेकांना जगण्याची नवी उर्जा देणारं ठरलं. मात्र याच डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येमुळं अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. राहत्या घरी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्यानंतर कुटुंबीयांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी डॉक्टरांना ताडकीनं रुग्णालयात नेलं. पण, उपचारांदरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.