School Closed : राज्यातील शाळा 8 आणि 9 जुलैला बंद राहणार? शिक्षण विभागाने केलं स्पष्ट

School Closed : राज्यातील शाळा 8 आणि 9 जुलैला बंद राहणार? शिक्षण विभागाने केलं स्पष्ट


Maharashtra School : पालक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 8 आणि 9 जुलै संपावर जाणार आहे. अनुदान आणि लाभांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होत असल्याने हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात एल्गार पुरकारला आहे. त्यामुळे राज्यातील शाळा 8 आणि 9 जुलैला बंद असणार की नाही याबद्दल पालक संभ्रमात होते. त्यामुळे राज्य शिक्षण विभागाने एक आदेश काढून त्याबद्दल स्पष्ट सांगितलं आहे. 

राज्यातील शाळा 8 आणि 9 जुलैला बंद राहणार?

येत्या 8 आणि 9 जुलैला राज्यातील शिक्षक समन्वय संघाने राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पण राज्यातील शिक्षण विभागाने आदेशात स्पष्ट केले आहे की, 8 जुलै मंगळवार आणि 9 जुलै बुधवारी राज्यातील शाळा बंद राहणार नाही.  माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालक महेश पालकर यांनी हा आदेश काढला आहे. त्यामुळे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे की, 8 आणि 9 जुलैला शाळा असणार आहे.

आझाद मैदानावर आंदोलन 

राज्यातील विविध शाळांमधील हजारो शिक्षक मुंबईतील आझाद मैदानात एकत्र येत सरकारचे लक्ष वेधणार आहे. पावसाळी अधिवेशन असल्याने मुंबईत येऊन सरकारला आपली नाराजी शिक्षण व्यक्त करणार आहेत. 

गेल्या वर्षी, अनुदानित शाळांसाठी वाढीव आर्थिक अनुदानाच्या मागणीसाठी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी 1 ऑगस्ट 2024 पासून 75 दिवस राज्यव्यापी निदर्शने केली. सरकारने त्यावेळी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. पण 14 ऑक्टोबर 2024 रोजी जारी केलेल्या अधिकृत सरकारी ठरावात (जीआर) निधी वाटप करण्यात त्यांनी अपयशी ठरले, त्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी पसरली आहे. 

10 ऑक्टोबर 2024 रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनुदानित शाळांना अनुदानाचा पुढील हप्ता देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण, एक वर्षानंतरही मागण्या पूर्ण न झाल्याने शिक्षक संघटनेने पुन्हा एकदा संपाचं हत्यार हाती घेतलं आहे. 





Source link

Raj Thackeray Vs Sushil Kedia वादात मुंबई पोलिसांची उडी; माफीनंतरही प्रकरण चिघळणार?

Raj Thackeray Vs Sushil Kedia वादात मुंबई पोलिसांची उडी; माफीनंतरही प्रकरण चिघळणार?


Raj Thackeray Vs Sushil Kedia: शनिवारी ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर पक्षाध्यक्ष राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना थेट आव्हान देणारे गुंतवणूक विश्लेषक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंची माफी मागत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र याच प्रकरणात आता एक नवीन घडामोड समोर आली आहे. ठाकरेंच्या मेळाव्याला तासभर शिल्लक असतानाच शनिवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी केडियांच्या कार्यालयाची तोडफोड केली. मात्र ही तोडफोड करणं या कार्यकर्त्यांना चांगलेच महागात पडलं आहे.

राज ठाकरेंना अनेकदा डिवचलं

केडियांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी पाच संशयितांना शनिवारी ताब्यात घेतले आहे. समाज माध्यमांवर केडिया यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.  त्यात त्यांनी मुंबईत 30 वर्षे राहूनही मी मराठी बोलू शकत नाही. राज ठाकरे तुम्हाला काय करायचं ते करुन घ्या, अशा आशयाची पोस्ट करत मनसेला खुली आव्हान दिलं होते. त्यानंतरही अन्य पोस्टमध्ये एकही जागा न निवडून आलेला पक्ष वगैरे असे संदर्भ देत केडिया यांनी मनसेला लक्ष्य केलेलं. मुंबईतील मीरा-भाईंदर परिसरात एका दुकानदाराला मराठी न बोलल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्यानंतर केडिया यांच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले.

कार्यालयावर हल्ला, व्हिडीओ अन् ताब्यात घेतले कार्यकर्ते

शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास वरळीमधील मेळाव्याला सुरुवात होण्याच्या काही काळ आधीच मनसे कार्यकर्त्यांनी वरळीमधीलच सेन्च्युरी बाजार येथील व्ही वर्क येथील केडीया यांच्या कार्यालयातील काचेच्या दरावर नारळ फेकले. सुरक्षारक्षकांनी हल्लेखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना फरसं यश आलं नाही. कार्यकर्ते ‘मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही’ अशा घोषणा देत होते आणि राज ठाकरे यांचा जयजयकार करत होते. या हल्ल्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. याच व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पाच संशयितांना केडियांच्या कार्यालयावर हल्ला केल्याप्रकरणी ताब्यात घेतलं आहे. या अटकेमुळे माफीनंतरही हे प्रकरण चिघळणार की काय अशी शक्यता व्यक्त केली जातेय.

केडियांचा माफीनामा

दरम्यान, मेळावा संपल्यानंतर अर्ध्या तासात केडिया यांनी सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ पोस्ट करत माफीनामा जाहीर केला. “माझं ट्विट चुकीच्या मनस्थितीत, दबावाखाली आणि तणावाखाली करण्यात आलेलं. त्यानंतर ह् ट्विट लोकांनी चुकीच्या पद्धतीने हाताळं आणि त्यातूनच वाद निर्माण झाला.  मराठी न जाणणाऱ्यांवर हिंसा होत असल्याने मी ओव्हररिऍक्ट केलं. त्यामुळे मी माझं हे ओव्हररिऍक्टिंग मागे घेण्याचे ठरवले,” असं म्हणत केडिया यांनी माफी मागितली. “30 वर्षे मुंबईत राहूनही मला मराठी भाषेची जितकी प्रावीण्यत आणि स्पष्टता मिळवायला हवी होती तितकं आपल्याला जमलं नाही. त्यामुळे मी मराठी भाषा फक्त अनौपचारिक वातावरणात आणि जवळच्या लोकांसोबत वापरली. भयाचे वातावरण असल्याने मराठी भाषेचा वापर करताना अनावश्यकपणे चुका होण्याची शक्यता असते, ज्यामुळे वाद निर्माण होऊ शकतो, असे ते माफीनाम्यात म्हणाले. 





Source link

भारतातील 23 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सरकारची मोठी घोषणा!

भारतातील 23 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सरकारची मोठी घोषणा!


NPS: केंद्र सरकारने देशातील 23 लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज दिलीय. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरू केलेल्या एकात्मिक पेन्शन योजनेला (यूपीएस) राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (एनपीएस) सारखे कर लाभ देखील मिळणार आहेत. अर्थ मंत्रालयाने एका निवेदनात यासंदर्भात माहिती दिली आहे. पारदर्शक, लवचिक आणि कर-कार्यक्षम पर्यायांद्वारे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती सुरक्षा मजबूत करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमध्ये हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे केंद्र सरकारने निवेदनात म्हटलंय. एनपीएस अंतर्गत उपलब्ध असलेले कर लाभ यूपीएसला देखील लागू होतील. कारण ते एनपीएस अंतर्गत एक पर्याय आहे. या तरतुदी विद्यमान एनपीएस रचनेसारख्या असतील.

NPS अंतर्गत पर्याय म्हणून UPS

अर्थ मंत्रालयाने 24 जानेवारी 2025 रोजी NPS अंतर्गत पर्याय म्हणून UPS सादर केले. 1 एप्रिल 2025 पासून केंद्र सरकारच्या नागरी सेवांमध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना ते लागू होईल. UPS लागू करण्यासाठी, पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (PFRDA) 19 मार्च रोजी एक नियमावली जारी केली होती. NPS मध्ये सहभागी असलेल्या आणि हा पर्याय निवडणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना UPS लागू होईल. सुमारे 23 लाख सरकारी कर्मचारी UPS निवडू शकतात. अलीकडेच सरकारने कर्मचाऱ्यांना UPS निवडण्याची अंतिम मुदत तीन महिन्यांनी वाढवून 30 सप्टेंबर केली आहे.

NPS सारखे फायदे मिळणार 

या तरतुदी विद्यमान एनपीएसप्रमाणे असून UPS निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरेशी कर सवलत मिळेल. अर्थ मंत्रालयाने 24 जानेवारी 2025 रोजी काढलेल्या नोटिफिकेशनुसार, 1 एप्रिल 2025 पासून केंद्र सरकारच्या नागरी सेवांमध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी एनपीएस अंतर्गत एक पर्याय म्हणून यूपीएस लागू करण्यात आला आहे. या नोटिफिकेशननंतर, एनपीएस अंतर्गत येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना देखील यूपीएस अंतर्गत सामील होण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

पीएफआरडीए करेल व्यवस्थापन 

या चौकटीची अंमलबजावणी करण्यासाठी, पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (पीएफआरडीए) ने 19 मार्च 2025 रोजी पीएफआरडीए (एनपीएस अंतर्गत एकात्मिक पेन्शन योजनेचे ऑपरेशन) नोटिफिकेशन काढले. एनपीएसच्या कक्षेत येणाऱ्या आणि एनपीएस अंतर्गत हा पर्याय निवडणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना यूपीएस लागू होते. सध्या 23 लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी त्याच्या कक्षेत येतात.

गेल्या वर्षी UPS लागू 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 24 ऑगस्ट 2024 रोजी UPS च्या पर्यायाला मान्यता दिली होती. जानेवारी 2004 पासून जुनी पेन्शन योजना (OPS) बंद केल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी NPS सुरू करण्यात आला. पण ही प्रणाली बाजार जोखमीच्या अधीन आहे. म्हणजेच या योजनेत हमी पेन्शन उपलब्ध नाही. कर्मचाऱ्यांनी याला विरोध केला आणि त्यांची ही कोंडी दूर करण्यासाठी, हमी पेन्शन यूपीएस लागू करण्यात आली आहे.





Source link

'एकही जागा नसलेल्यांनाही…', केडियांनी पुन्हा राज ठाकरेंना डिवचलं; 'लालबागचा राजा'च्या चरणातील फोटो पोस्ट करत म्हणाले, 'शिवाजी…'

'एकही जागा नसलेल्यांनाही…', केडियांनी पुन्हा राज ठाकरेंना डिवचलं; 'लालबागचा राजा'च्या चरणातील फोटो पोस्ट करत म्हणाले, 'शिवाजी…'


MNS Shivsena Victory Rally Sushil Kedia New Post: “मी मराठी शिकणार नाही अशी शपथ घेतो, काय करायचं बोल?” अशा शब्दांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना आव्हान देणारे उद्योजक सुशील केडिया यांनी दिलं आहे. आपल्या एक्स अकाऊंटवरुन राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या केडिया यांनी वादाला तोंड फुटल्यानंतर काही पोस्ट करत पुन्हा एकदा राज ठाकरेंना डिवचलं आहे.

लालबागच्या राजाच्या चरणी केडिया

“हे पाहा राज ठाकरेजी, आम्हालाही गणपती बाप्पा मोरया म्हणायचं आहे आणि तुम्हालाही. आपला देव एक आहे. आपला देश एक आहे. भाषा आणि प्रेमाला संधी द्या लोकांना स्वीकारण्याची. मारलं, फटकावलं, घाबरवलं तर कोणी कशाला शिकेल? केवळ भीती दाखवून शिकणार का?” असा सवाल सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना विचारला आहे. हा सवाल त्यांनी एक फोटो रिट्वीट करत विचारला आहे. या फोटोमध्ये सुशील केडिया ‘लालाबागचा राजा’च्या चरणी माथा टेकवत असल्याचं दिसत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत केडिया यांनी आणखी एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी मराठीत, “जेव्हा शिवाजी महाराजांनी संपूर्ण भारतावर मराठा साम्राज्य स्थापन केले तेव्हा त्यांनी मराठी भाषा कोणावरही लादली नाही आणि महाराष्ट्रात एकही जागा नसलेल्यांनाही बळजबरी करायची आहे,” असा टोला राज ठाकरेंना लगावला आहे. याच पोस्टच्या शेवटी त्यांनी, “देवेंद्र फडणवीसजी अशा पराभूतांना नियंत्रित करायला हवे,” असा केडियांनी म्हटलं आहे.

…तर माझ्यासहीत सगळेच प्रेमाने मराठी शिकतील

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नोंदवलेल्या प्रतिक्रियेवर व्यक्त होताना केडिया यांनी, “देवेंद्र फडणवीसांच्या या भूमिकेमुळे माझ्यासहीत सगळे प्रेमाने मराठी बोलतील. प्रत्येक व्यक्तीला स्वत:चा आत्मसन्मान महत्त्वाचा असतो. हाच कोणी चिरडण्याचा प्रयत्न केला तर आधी लोक त्याच्या संरक्षणासाठी प्रयत्न करतील राज ठाकरे!” असं फडणवीसांच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ पोस्ट करत म्हटलं आहे.

केडियांना राज ठाकरे आज उत्तर देणार?

केडिया यांच्याबद्दल आजच्या विजयी मेळाव्यामध्ये राज ठाकरे काही बोलतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, आजच्या ‘सामना’च्या अग्रलेखामधून केडियांनी केलेल्या विधानाचा समाचार घेताना, “केडिया नावाचा एक व्यापारी महाराष्ट्राला आव्हान देत त्याची टांग वर करून सांगतो, ‘‘मी महाराष्ट्रात 30 वर्षे राहतो, पण मराठी बोलणार नाही.’’ हे धाडस या लोकांत वाढले आहे. कारण अमित शहा यांनी मराठी माणसांची भक्कम एकजूट तोडली आहे. मराठी एकजूट तोडून त्यांनी शिंदेसारख्या लोकांना मांडलिक केले. पैशांच्या ताकदीवर माणसे विकत घेण्याचा (स्वाभिमानासह) गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे. तो रोखायचा असेल तर ‘हर हर महादेव’, ‘जय भवानी, जय शिवाजी’चा गजर करत आज वरळीच्या दिशेने मराठी माणसाला कूच करावी लागेल,” असं म्हटलं आहे.





Source link

'एकतर भोंदू आहेत किंवा…', शिंदेंनी 'जय गुजरात' नारा दिल्यानंतर शिवसेनेकडून उद्धव ठाकरेचा व्हिडीओ पोस्ट; करुन दिली आठवण

'एकतर भोंदू आहेत किंवा…', शिंदेंनी 'जय गुजरात' नारा दिल्यानंतर शिवसेनेकडून उद्धव ठाकरेचा व्हिडीओ पोस्ट; करुन दिली आठवण


राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर कार्यक्रमात ‘जय गुजरात’ असा नारा दिल्याने वाट पेटला आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून कडाडून टीका होत आहे. महाराष्ट्राच्या राज्याचे मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री यांना अमित शहांमुळे विसर पडलेला आहे. हे स्वतःला शिवसेनेचे प्रमुख मानतात पण ती शहा शिवसेना आहे. त्यांनी अमित शहांसमोर अशा प्रकारची लाचारी पत्करली आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. यानंतर आता शिवसेनेने उद्धव ठाकरेंचा एक जुना व्हिडीओ पोस्ट करत प्रत्युत्तर दिलं आहे. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे असणाऱ्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या शेवटी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात’ अशी घोषणा दिली. यामुळे टीका होत असताना आता शिवसेनेने एक्सवर उद्धव ठाकरेंचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात उद्धव ठाकरे हे ‘जय गुजरात’ म्हणत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना सोबत ‘एकतर हे भोंदू आहेत नाही तर संधीसाधू’ अशीही टीका करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे गुजरातमधील भाजपाच्या कार्यक्रमात गेले होते हा व्हिडीओ तेव्हाचा आहे. 

मतांसाठी आधी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी गुजरात मतदारांना जवळ करण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. त्यासाठी कधी ‘जिलेबी ने फापडा, उद्धव भाई आपडा’, अशा घोषणा दिल्या होत्या. तर आदित्य ठाकरे यांनीही ‘केम छो वरळी’ अशी घोषणा दिली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे ‘एकतर हे भोंदू आहेत नाही तर संधीसाधू’. अशी घणाघाणी टीका शिवसेनेच्या अधिकृत सोशल मिडीया खात्यावरून करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“अमित शाह महाराष्ट्राचे जावई आहेत. कारण त्यांच्या होम मिनिस्टर कोल्हापूरच्या आहेत. गुजराती बांधवांनी एकजूट कायम ठेवावी राज्याच्या प्रगतीमध्ये तुमचा वाटा आहे,” असं सांगत एकनाथ शिंदे यांनी शायरीच्या माध्यमातून अमित शाहांवर स्तुतीसुमनं उधळळी. दरम्यान भाषण संपवताना एकनाथ शिंदे यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात’ अशी घोषणा दिली.

राऊतांकडून टीकेची झोड 

“महाराष्ट्राच्या राज्याचे मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री यांना अमित शहांमुळे विसर पडलेला आहे. हे स्वतःला शिवसेनेचे प्रमुख मानतात पण ती शहा शिवसेना आहे. त्यांनी अमित शहांसमोर अशा प्रकारची लाचारी पत्करली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच म्हटलं होतं की ज्या राज्यात गेलो त्या राज्याचा जय करणार. महाराष्ट्राच्या पुण्यनगरीमध्ये गुजरातचा नारा दिला आहे. महाराष्ट्र गुजरातला विकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मी त्यावरती या सर्वांचे सही शिक्के आहेत हे स्पष्ट झालं आहे,” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. 

“गुजरातींबद्दल आमच्या मनात कुठलीही द्वेष भावना नाही. सध्याचे उपमुख्यमंत्री आपल्या मालकाच्या समोर जय गुजरात म्हणतात म्हणजे त्यांच्या मनात नक्की काय चाललंय? ते डुप्लिकेट नाही तर शहासेना आहेत असं म्हणा. मराठी माणसाची संस्कृती आणि बालेकिल्ला असणाऱ्या ठिकाणी जय गुजरातचा नारा दिला आहे. ते कोणाच्या हातात आहे हे त्यांनी दाखवून दिलं. एकनाथ शिंदे यांच्या पोटातलं ओठावर आलेला आहे. त्यांच्या पक्षाचा उदयच सुरतला झालेला आहे,” अशीही टीका त्यांनी केली आहे. 





Source link

सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा आहेर, विविध मुद्द्यावरून सरकारला दाखवला आरसा

सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा आहेर, विविध मुद्द्यावरून सरकारला दाखवला आरसा


विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार हे अनेक सवाल उपस्थित करत आपल्याच सरकारला धारेवर धरताना दिसताहेत. आता विधीमंडळाच्या इंग्रजी कामकाज पत्रिकेवर आक्षेप घेत मुननंटीवार यांनी सरकारला सवाल केलाय.

पावसाळी अधिवेशन सुरू झालेल्यापासून आपल्या सरकारवर वार करणाऱ्या आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा सरकारला घरचा आहेर दिलाय. मराठीच्या मुद्द्यावरून सुधीर मुनगंटीवार विधानसभेत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. विधीमंडळाच्या इंग्रजी कामकाज पत्रिकेवर त्यांनी आक्षेप घेत सरकारला धारेवर धरलंय. मराठी अभिजात भाषा असताना कामकाज पत्रिका इंग्रजीत का छापता? असा थेट सवालच त्यांनी विधानसभाध्यक्षांना विचारलाय.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या या आक्षेपानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काहीसं मिश्किल उत्तर दिलं. राज्यात 24 तास वाळूच्या वाहतुकीला परवानगी देण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात केली. यावरी सुधीर मुनगंटीवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत नाराजी व्यक्त केली. बुलेट ट्रेनपेक्षा वेगात काम करणारे मंत्रिमहोदय घरकुलांचा प्रश्न आला की पॅसेंजरपेक्षा स्लो का होतात असा सवाल करत मुनगंटीवार यांनी बावनकुळेंना टोला लगावलाय. 

वाळूच्या 24 तास वाहतुकीला परवानगी दिल्याची घोषणा सभागृहात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केली , वाळू धोरणावर बोलत असताना देखील भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची नाराजी काही लपून राहिली नाही. एवढंच काय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धीवरून देखील टोला लगावला. सीएम बुलेट ट्रेन पद्धतीन काम करतात पण सामान्य लोकांना घरकूल बांधणी करताना स्लो का होतात ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सभागृहात आज सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानांची जोरदार चर्चा रंगली, सभागृहाच्या कार्यक्रम पत्रिकेवरून तसेच मुख्यमंत्र्यांच्या कामाच्या पद्धतीवर बोलून मुनगंटीवार यांनी सरकारला घरचा आहे दिल्याचे पाहायला मिळतेय, तसेच त्यांची नाराजी चव्हाट्यावर आल्याचं देखील बोललं जातंय. याविषयी बोलताना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू काय म्हणाले पाहुयात  तर सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारचे डोळे उघडलेत आता तरी सरकारने शहाणं व्हवं असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी सरकारवर निशाणा साधलाय.





Source link