Balasaheb Thackeray Birth Anniversary : राजकारणातील भगवं वादळ! जाणून घ्या बाळासाहेब ठाकरे यांची वंशवेल

Balasaheb Thackeray Birth Anniversary : राजकारणातील भगवं वादळ! जाणून घ्या बाळासाहेब ठाकरे यांची वंशवेल


Genealogy of Thackeray : प्रखर लेखणी, धारदार कुंचला, टोकदार बाण, झुंजार नेते आणि परखड वक्ते असा उच्चार केला तर एकच चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो, तो म्हणते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा… मात्र, त्यांची ओळख नेहमी राजकारणातील भगवं वादळ अशी सांगितली तर वावगं ठरणार नाही. बाळासाहेबांचा राजकीय प्रवास झंझावाती राहिला. आज (23 जानेवारी) बाळासाहेब ठाकरे यांची 98 वी जयंती साजरी केली जात (Balasaheb Thackeray 98 th Birth Anniversary) आहे. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं भक्कम स्थान निर्माण करणाऱ्या ठाकरे कुटूंबाची वंशवेल कशी आहे? पाहुया…

ठाकरे नव्हे धोडपकर

ठाकरे कुटूंबाचं मुळ आडनाव धोडपकर होतं. प्रबोधनकार ठाकरे यांचे पणजोबा कृष्ण माधव धोडपकर हे रायगडमध्ये वास्तव्यास होते. मात्र, त्यांच्या पुत्रांनी म्हणजेच रामचंद्र धोडपकर यांनी आडनाव बदलून पनवेलकर केलं. रामचंद्र धोडपकर हे पनवेलमध्ये स्थाईक झाल्याने त्यांनी आडनाव बदललं. प्रबोधनकारांना (केशव सिताराम ठाकरे) वाचनाची आवड होती. ब्रिटीश लेखक विल्यम मेकपीस थॅकरे यांचा प्रभाव प्रबोधनकारांवर पडला. त्यामुळे त्यांनी आपलं आडनाव पनवेलकर न ठेवता ठाकरे केलं.

प्रबोधनकार ठाकरे

प्रबोधनकार ठाकरे आणि रमाबाई यांना एकूण आठ अपत्ये… त्यात 3 मुलगे आणि 5 मुली… बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे आणि रमेश ठाकरे अशी त्यांच्या मुलांची नावं. बाळासाहेब ठाकरे 21 वर्षांचे असताना त्यांनी सरला वैद्य यांच्याशी लग्न केलं. त्यानंतर सरला सासरी येऊन मिनाताई झाल्या. रमेश ठाकरे यांनी लग्न केलं नाही. तर श्रीकांत ठाकरे यांचे चिरंजीव राज ठाकरे सध्या राजकारणात आहेत.

बाळासाहेब ठाकरे आणि मिनाताईंना तीन मुलं… सगळ्यात थोरले बिंदुमाधव ठाकरे, दुसऱ्या नंबरचे जयदेव ठाकरे आणि धाकटे चिरंजीव उद्धव ठाकरे… 

बिंदुमाधव ठाकरे

बिंदुमाधव ठाकरे यांचा राजकारणाचा जास्त काही संबंध आला नाही. त्यांनी स्वत:ची व्हिडिओ कंपनी सुरू केली होती आणि नंतर फीचर फिल्म्सच्या निर्मितीकडे वळले. मात्र, 1996 मध्ये लोणावळा इथं त्यांचा अकाली मृत्यू झाला होता. मग त्यानंतर त्यांचं कुटुंब ‘मातोश्री’ हे ठाकरेंचं निवासस्थान सोडून बाहेर पडलं. बिंदुमाधव यांना दोन मुलं आहेत. निहार ठाकरे असं मुलाचं नाव आहे. तर नेहा ठाकरे असं मुलीचं नाव… निहार ठाकरे यांचा इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांच्या लेकीशी (अंकिता पाटील) विवाह झाला होता. त्यानंतर त्यांनी शिंदे गटाला समर्थन दिलंय. तर नेहा ठाकरे यांचं विवाह डॉ. मनन ठक्कर यांच्याशी झाला.

जयदेव ठाकरे

जयदेव ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे थोरले बंधू… बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर संपत्तीवरून जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातला वाद उफाळून आला होता. जयदेव ठाकरेंची तीन लग्न झाली. पहिल्या पत्नीचं नाव जयश्री ठाकरे. जयदेव आणि जयश्री यांना एक जयदीप नावाचा मुलगा आहे. जयदीप हे आर्ट डिरेक्टर आणि ग्राफीक्स डिझायनर आहेत. तर दूसरी पत्नी स्मिता ठाकरे यांच्यापासून राहूल आणि ऐश्वर्य अशी दोन मुलं आहेत. तर तिसरी पत्नी अनुराधा यांच्यापासून माधुरी नावाची मुलगी आहे. 

बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती बरी नसताना उद्धव ठाकरेंकडून त्यांची दिशाभूल केली, असा आरोप जयदेव ठाकरे यांनी केला होता. बाळासाहेबांनी माझ्याजवळ त्यांनी मन मोकळं केलं होतं पण मी आत्ता बोलू शकत नाही कारण बोललो तर त्यावरून प्रचंड मोठा गदारोळ होईल, असं जयदेव ठाकरे यांनी झी 24 तासशी बोलताना म्हटलं होतं.

उद्धव ठाकरे

बाळासाहेबांचे तिसरे पुत्र उद्धव ठाकरे यांनी 1989 मध्ये रश्मी ठाकरे यांच्याशी विवाह केला. त्यांना दोन पुत्र आहेत. मोठा मुलगा आदित्य ठाकरे आणि दुसरा मुलगा तेजस ठाकरे… आदित्य ठाकरे राजकारणात सक्रिय आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते मंत्री देखील होते. उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात. तेजस ठाकरे राजकारणात येणार अशी चर्चा नेहमी होते. मात्र, त्यांनी कधी रस दाखवला नाही. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर तेजस ठाकरे राजकीय मंचावर दिसू लागले आहेत. मुलगा तेजस हे वन्यजीव अभ्यासक म्हणजेच वाईल्डलाईफ रिसर्चर आहेत. नुकताच त्यांनी सापसुरळ्यांच्या नव्या कुळाचा आणि पाच नव्या प्रजातींचा शोध लावला होता.

श्रीकांत ठाकरे 

बाळासाहेब ठाकरे यांचे धाडके बंधू श्रीकांत ठाकरे यांना कुंदा ठाकरे यांच्याशी विवाह झाला. श्रीकांत आणि कुंदा यांना दोन मुलं… एकाचं नाव राज ठाकरे (स्वरराज ठाकरे) आणि दुसऱ्या मुलीचं नाव जयवंती ठाकरे… राज ठाकरे यांचं नाव महाराष्ट्राच्या राजकारणाला माहित आहेतच… राज ठाकरे यांचा विवाह शर्मिला ठाकरे यांच्याशी झाला. त्यांना अमित ठाकरे आणि उर्वशी ठाकरे अशी दोन मुलं आहेत. उर्वशी ठाकरे फॅशन डिझायनर आहेत. तर राजपुत्र अमित ठाकरे देखील राजकारणात सक्रिय झाले आहेत. तर अमित ठाकरेंना मागील वर्षी पुत्रप्राप्ती झाली होती, त्याचं नाव ‘किआन’.





Source link

रामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा ढोल वाजवत जल्लोष, फडणवीसांनीही अनुभवला सोहळा

रामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा ढोल वाजवत जल्लोष, फडणवीसांनीही अनुभवला सोहळा


Ram Mandir : अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतल्या राममंदिरात प्राणप्रतिष्ठा (Ram Pran Pratishtha) करण्यात आली. मोदींनी गर्भगृहात विधिवत पूजा केली. महाराष्ट्रातल्या पुरोहितांसह देशभरातल्या पुरोहितांच्या मंत्रोच्चारात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी पंतप्रधान मोदींसह (PM Modi) गाभा-यात सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन मेहता आणि पुजारी उपस्थित होते. मोदींनी पूजा केल्यानंतर रामलल्लाच्या चांदीच्या मूर्तीची पूजा करण्यात आली. त्यानंतर रामलल्लाच्या मूर्तीसमोरचा पदडा हटवण्यात आला आणि रामलल्लाचं सुंदर दर्शन जगाला झालं. 

ज्या क्षणाची रामभक्तांनी गेली कित्येक वर्षं वाट पाहिली, तो सुवर्णक्षण आज अख्ख्या जगानं अनुभवला. अयोध्येतल्या (Ayodhya) राममंदिरात रामाची प्राणप्रतिष्ठा झाली. आणि डोळ्यांचं पारणं फेडणारी बाल रामाची मूर्ती अख्ख्या जगानं पाहिली. रामलल्लाला हिरेजडित मुकूट घालण्यात आलंय…कपाळी टिळा, हातात धनुष्यबाण, आभूषणांनी सजवण्यात आलंय. चेहऱ्यावर स्मित हास्य, कमलनयन, कानात कुंडलं, गळ्यात रत्नजडित हार घालण्यात आलाय…यामुळेच रामल्लाची मूर्ती सुंदर, मनमोहक, तेजस्वी रुपात दिसतेय. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येतल्या मंदिरात रामाची प्राणप्रतिष्ठा केली… विधिवत पूजा झाल्यानंतर मोदींनी रामाच्या चरणी फुलं वाहिली. त्यानंतर पंतप्रधानांनी राममूर्तीची पंचारती ओवाळून आरती केली. मंदिरातले मुख्य उपचार पार पडल्यानंतर मोदींनी रामाच्या मूर्तीला प्रदक्षिणा घालत रामासमोर साष्टांग नमस्कार घालून नमन केलं.  रामलल्लाला आता तंबूत राहावं लागणार नाही, अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आपले राम आले आहेत अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अयोध्यावासियांनी शेकडो वर्ष विरह सहन केला असं सांगत त्यांनी अयोध्यावासियांचंही कौतुक केलं. 22 जानेवारी ही तारीख नाही तर कालचक्राचा उगम आहे असंही मोदींनी म्हंटलंय.

सीएम शिंदेंनी ढोल वाजत केला आनंद
अयोध्येत प्रभू श्रीरामाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते प्राणप्रतिष्ठा संपन्न झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सहकाऱ्यांसोबत एकच जल्लोष केला. मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातील कोपीनेश्वर मंदिरात मुख्यमंत्र्यांनी हा सोहळा लाईव्ह पाहिला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जय श्रीरामचा जयघोष केला. त्यानंतर ढोल वाजवून शिंदेंनी शिवसैनिकांसोबत आपला आनंद साजरा केला..

देवेंद्र फडणवीस नागपूरात
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी नागपुरातल्या रामनगर इथल्या राममंदीर परिसरातून अयोध्येतला प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहीला. श्रीरामाच्या मूर्तीवरचा पडदा दूर होताच देवेंद्र फडणवीसांनी दिलेली प्रतिक्रिया खुपच बोलकी होती. मूर्ती अतिशय सुंदर असल्याची प्रतिक्रिया त्यांनी उपस्थितांसमोर बोलून दाखवली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फेब्रुवारीमध्ये प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येत जाणार आहेत.. रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा आज अयोध्येतल्या राम मंदिरात करण्यात आली..  मूर्ती स्थापनेनंतर राम दर्शनाची ओढ आहे. ही ओढ फेब्रुवारीमध्ये पूर्ण होणार असल्याचं फडणीस म्हणालेत. त्यामुळे येत्या फेब्रुवारीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि फडणवीस यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ अयोध्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

अयोध्येत प्रभू श्रीरामच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी श्रीराम पालखीमध्ये सहभाग घेतला. डीजेच्या तालावर ठेका धरत गुलाबरावांनी कार्यकर्त्यांसोबत आनंद लुटला. देशभरात सर्वत्र उत्सवाचं वातावरण पाहायला मिळतंय. राज्याचे मंत्री देखील या उत्सवात सहभागी झाले.

रामभक्तांच्या राहण्याची सोय
अयोध्येत जाणा-या रामभक्तांसाठी महाराष्ट्र सरकारतर्फे राहण्याची सोय केली जाईल, अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी केलीय.. राज्य सरकार लवकरच अयोध्येत धर्मशाळा आणि भक्त निवास बांधणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं… अयोध्येतील मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा नार्वेकरांनी कुलाब्यातील राममंदिरात साजरा केला. यावेळी ते रामभजनांमध्ये तल्लीन झाले होते. लवकरच आपण रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.





Source link

33 हजार 258 पणत्यांनी साकारला रामनामाचा मंत्र; चंद्रपूरने नोंदवला गिनीज विश्वविक्रम

33 हजार 258 पणत्यांनी साकारला रामनामाचा मंत्र; चंद्रपूरने नोंदवला गिनीज विश्वविक्रम


Ram Mandir Inauguration: मंगलवेशातील हजारो रामभक्त… रामभक्तीने ओतप्रोत वातावरण… एका क्षणाला हजारो पणत्या प्रज्वलित व्हायला सुरुवात झाली… आणि बघता बघता ‘सियावर रामचंद्र की जय’ ही दीपाक्षरे अवतरी. हे विहंगम दृष्य साकारले होते चंद्रपूरच्या चांदा क्लब ग्राऊंडवर. 33 हजार 258 पणत्यांनी साकारलेला रामनामाचा मंत्र गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घालणारा ठरला आणि अवघे चंद्रपूर ‘राममय’ झाले. याची दखल घेत आज (रविवार) गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे मिलींद वेरलेकर आणि प्रसाद कुलकर्णी यांनी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रमाणपत्र प्रदान केले तेव्हा टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.

दीपोत्सवाचे जगभरातील लाखो रामभक्त साक्षीदार ठरले. पहिली रामज्योत प्रज्वलित करण्याचा मान वाल्मिकी समाजाच्या शशी लखन, दुसरी ज्योत प्रज्वलित करण्याचा मान केवट भोई समाजाच्या आशा दाते,  तिसरी ज्योत प्रज्वलित करण्याचा मान मुस्लिम समाजाच्या चांद पाशा सय्यद, चौथी ज्योत प्रज्वलित करण्याचा मान अनुसूचित जातीच्या प्रियंका थुल, पाचवी ज्योत प्रज्वलित करण्याचा मान आदिवासी समाजाच्या गीता गेडाम तर सहावी रामज्योत प्रज्वलित करण्याचा मान शीख समाजाच्या वतीने बलजीत कौर बसरा यांना मिळाला. तसेच सौ. सपना मुनगंटीवार, शलाका बिडवई यांनीही ज्योत पेटवली. त्यानंतर राम सेविकांमार्फत संपूर्ण ज्योती पेटविण्यात आल्या.

हा नयनरम्य सोहळा साजरा होत असताना सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरकरांचे कौतुक केले. ‘अयोध्येच्या प्रभू श्रीराम मंदिरासाठी 29 मार्च 2023 रोजी चंद्रपूर-गडचिरोलीच्या दंडकारण्यातून अतिशय पवित्र भावनेने सागवान काष्ठ पाठविण्यात आले. त्या काष्ठापासून प्रभू राम मंदिराच्या गर्भगृहाच्या महाद्वाराचे अतिशय सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे. प्रभू श्रीरामाच्या नावामध्ये चंद्रपूरचा चंद्र देखील आहे. प्रभू राम देशाच्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळे विश्वविक्रमी रामज्योत प्रज्वलित करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही रामज्योत सेवेची व भक्तीची आहे,’ अशा उत्स्फूर्त भावना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

‘सियावर रामचंद्र की जय’ या 11 अक्षरी मंत्राच्या दीपप्रज्वलनाचे फोटो व व्हिडिओ गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या लंडन कार्यालयाला तसेच १८० देशांमध्ये पाठविले जाणार आहेत, अशी माहिती गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे श्री. मिलिंद वेर्लेकर यांनी दिली.

देशभरातून चंद्रपूरकरांचे अभिनंदन – ना. सुधीर मुनगंटीवार

रामभक्तीचा विश्वविक्रम केल्यामुळे जगात चंद्रपूरचा गौरव वाढला आहे. आज झालेल्या ऑनलाईन बैठकीत देशभरातील केंद्राचे प्रतिनिधी, महामंत्री, राज्याचे अध्यक्ष, प्रमुख, 21 खासदारांच्या बैठकीत सर्वांत पहिले एकमताने चंद्रपूरच्या अभिनंदनचा प्रस्ताव मांडण्यात आला, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

‘अयोध्येच्या वर्तमानपत्रात चंद्रपूरच्या सागवान काष्ठाचे कौतुक करण्यात आले आहे. मी कारसेवेला गेलो होते तेव्हाच्या सर्व घटना आजही आठवतात. त्यामुळे आज प्रभूरामाच्या चरणी सेवा अर्पण करून आयुष्य सार्थकी लागल्याचे समाधान आहे. आता पुढच्या टप्प्यात रामभक्तीचा विश्वविक्रम करणाऱ्या 1350 रामभक्तांना अयोध्येला नेण्याचा संकल्प केला आहे,’ असेही ते म्हणाले.

भवानी मातेची पालखी अन् श्रीशैलमचे मंदिर

 छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक होण्यापूर्वी प्रतापगडच्या भवानी मातेच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज गेले होते. तिथे त्यांनी एक रत्नजडीत छत्र भवानी मातेला चढवले. नंतर त्याची लूट झाली. पण पुन्हा चांदीचे छत्र बसविण्याचे भाग्य आपल्याला लाभले. महाराजांच्या राज्याभिषेकाची शोभायात्रा निघते तेव्हा पालखीही निघते. ही पालखी सुद्धा जीर्ण झाली होती. ती आपण चंद्रपूरच्या वतीने साठ किलो चांदीची पालखी दिली. पुढील दोनशे वर्षे राज्याभिषेकाची शोभायात्रा त्याच पालखीतूनच निघणार आहे याचा अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या श्रीशैलममध्ये तपश्चर्या केली, तिथे महाराजांचे एक छोटे मंदिर होते. सरकारने तिथे भव्यदिव्य मंदिर उभे केले. २९ जुलै १९५३ नंतर पहिल्यांदा अफजलखानाच्या कबरीचे अतिक्रमण सरकारने हटवले. महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखे सरकार ब्रिटनवरून भारतात येणार आहेत. जम्मू-काश्मीर मधील कुपवाडा येथे ‘आम्ही पुणेकर’ या संस्थेमार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाकिस्तानच्या दिशेने तलवार पकडलेल्‍या पुतळ्याचे देखील काही दिवसांपूर्वी अनावरण झाले. आता शत्रूची वाकडी नजर भारतावर पडणार नाही, याचाही ना. श्री. मुनगंटीवार यांनी आवर्जून उल्लेख केला.

राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूर शहरातील डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, भाजपा महानगराचे अध्यक्ष राहुल पावडे, देवराव भोंगळे, डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी वाचनालय अध्यक्ष राजेश्वर सुरावार, डॉ. तन्मय बीडवाई, पवन गादेवार, मिलिंद वेरलेकर, प्रसाद कुलकर्णी, पवन गादेवार, मधुसूदन रुंगठा, शैलेंद्र शुक्ला, अशोक संगिडवार, डॉ. गुलवाडे, प्रमोद कडू, राखी कंचर्लावार, रोडमल गहलोत, शैलेश बागला, मधुसूदन रूंगठा, चमकोरसिंह बसेरा, मीना देशकर, गिरिश मारलीवार, अन्नाजी ढवस, विनोद तिवारी, प्रभाकर खड़के,  कुशन नागोसे, स्मिता रेवनकर, चंदाताई इटनकार, दामोदर सारडा, राजीव गोलीवार आदींची उपस्थिती होती.





Source link

शिरोळे गावाची 450 वर्षांची गावपळण; अख्खा गाव पाच दिवस राहतो वेशीबाहेर

शिरोळे गावाची 450 वर्षांची गावपळण; अख्खा गाव पाच दिवस राहतो वेशीबाहेर


उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग : तळकोकणात अनेक प्रथा परंपरा पाहायला मिळतात. त्यातच एक अनोखी प्रथा परंपरा आहे ती म्हणजे गावपळण. वैभववाडी तालुक्यातील शिराळे गावात सुद्धा ही प्रथा अखंडित सुरू आहे. शिराळे गावच्या गाव पळणीला सुरवात झाली असून आता पाच दिवस हे गाव वेशीबाहेर वसणार आहे.

सिंधुदुर्गातील शिराळेच्या गावपळणीला सुरुवात 450 वर्षांची परंपरा जपणाऱ्या शिराळे गावच्या गावपळणीला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. गावपळणी दरम्यान शिराळेवासीय पाळीव प्राण्यांसह आणि लागणारा धान्याचा साठा घेऊन नजीकच्या सडूरे गावाच्या हद्दीत दडोबा डोंगराच्या पायथ्याशी राहुट्यामध्ये विसावले आहेत.देवाला कौल लावून हुकूम घेतला जातो. त्यानंतर गावाबाहेर सर्व लोक बाहेर पडतात. तसेच गावभरणीच्या वेळी सुद्धा देवाला कौल लावूनच गाव भरणी केली जाते.देव गांगोचा हुकूम मिळत नाही तोपर्यंत ग्रामस्थ गावाच्या बाहेर राहतात. त्यामुळे तीन, पाच, सात दिवसांची ही गावपळण असते. तळकोकणात काही ठराविक गावात गावपळणीची प्रथा आहे.मात्र दरवर्षी होणारी ही एकमेव गावपळण.

या शिराळे गावातील ही दृष्य पाहिली की वाटेल की गावात घरे आहेत पण माणसे कुठे दिसत नाही. गावच्या प्रथेनुसार वर्षातून एकदा इथे गाव सोडावा लागतो आणि पाच दिवस गावात कोणी माणूस थांबत नाही असं इथले स्थानिक ग्रामस्थ सांगतात. तसेच जनावरे पाळीव प्राणी, कोंबड्या, गुरे ढोरे,सर्व वेशी बाहेर घेऊन जावे लागते. गावात शाळा सुद्धा पाच दिवस भरत नाही. ती सुद्धा गावाबाहेर भरवली जाते. त्यामुळे या गावात फक्त स्मशान शांतता असते.

या गावपळनीसाठी चाकरमानी, माहेरवशनी ही आवर्जून हजेरी लावतात. तीन दिवसानंतर गावच्या देवाला कौल लावून पुन्हा हे ग्रामस्थ माघारी गावात येतात. ही गावपळनीचा आनंद लुटण्यासाठी चाकरमानी देखील हजेरी लावतात. दरम्यान, महाराष्ट्राला उत्सव आणि परंपरांचा मोठा वारसा लाभलेला आहे. मात्र आजच्या आधुनिकतेच्या युगात श्रद्धेला अंधश्रद्धेचे ग्रहण लागू न देण्याची खबरदारी घेतल्यास परंपरा टिकवण आणि त्यांचा आनंद घेण निरंतर शक्य होईल जर म्हटलं तर श्रद्धा नाहीतर अंधश्रद्धा होऊ शकते.

ही वाडवडिलांनी सुरु केलेली 450 वर्षांची परंपरा आहे. मंदिरात जाऊन कौल प्रसाद घेतल्यानंतर आम्ही सीमेच्या बाहेर येतो. इथे झोपडी बनवून पाच दिवस राहतो. काही पाळीव प्राणी, जनावर असेल तर त्यांनाही सोबत घेऊन येतो. इथे पाच दिवस झाल्याशिवाय परत जात नाही, असे इथल्या ग्रामस्थाने सांगितले.





Source link

हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी परवानगी न मिळाल्याने उद्धव ठाकरेंचा शिवनेरी किल्ल्याचा दौरा रद्द

हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी परवानगी न मिळाल्याने उद्धव ठाकरेंचा शिवनेरी किल्ल्याचा दौरा रद्द



उद्धव ठाकरेंचा शिवनेरी दौरा रद्द झाला आहे. हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी परवानगी न मिळाल्याने दौरा रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.



Source link

रोहित पवारांना ईडीची नोटीस; शरद पवार म्हणाले, 'सहा महिने तुरुंगात…'

रोहित पवारांना ईडीची नोटीस; शरद पवार म्हणाले, 'सहा महिने तुरुंगात…'


Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शुक्रवारी नोटीस पाठवली आहे. ईडीने आमदार रोहित पवार यांना 24 तारखेला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. रोहित पवार यांच्यासह मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनाही ईडीने समन्स बजावलं आहे. सत्ताधारी भाजपवर विरोधी पक्षांकडून सातत्याने हल्लाबोल केला जात असताना आणि केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप होत असतानाच या दोघांनाही समन्स प्राप्त झालं आहे. रोहित पवार यांना आलेल्या ईडीच्या नोटीशीवर प्रतिक्रिया दिली आहे.

काही दिवसांपूर्वी बारामती अॅग्रोशी संबंधित कारखाने आणि कार्यालयांवर ईडीने छापे टाकले होते. रोहित पवार हे बारामती अॅग्रोचे संचालक असून अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. ईडीचे अधिकारी त्यांचे काम करत आहेत. तपासात ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहोत असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे. सोलापुरात बोलताना शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“संजय राऊत, अनेक देशमुख  यांनासुद्धा ईडीची नोटीस आली आली आहे. अनिल देशमुख सहा महिने तुरुंगात राहिले आहे. ईडीचा वापर विरोधकांविरुद्ध होत आहे. सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा दुरुपयोग होत आहे. मलाही ईडीची नोटीस झाली होती. रोहित पवार यांना नोटीस आली असेल. पण चिंता करायची कारण नाही,” असे शरद पवार यांनी म्हटलं आहे.

रोहित पवार काय म्हणाले?

या नोटीसीनंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. “ईडीच्या बातमीमुळं राज्यातून अनेकांनी फोन/मेसेज केले. या सर्वांचे मनापासून आभार मानतो, परंतु काळजीचं काहीही कारण नाही. कोणत्याही अधिकाऱ्यांची चूक नसते तर ते केवळ आदेशाचं पालन करुन त्यांचं काम करत असतात म्हणून त्यांना सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. आजपर्यंत सर्वच यंत्रणांना सहकार्य केलं आणि यापुढंही राहील. म्हणूनच ईडीला विनंती केलीय की, मराठा आरक्षणाचा विषय महत्त्वाचा असून राज्यभरातून आंदोलक मुंबईत येत आहेत. या पार्श्वभूमीवर 24 तारखेऐवजी 22 किंवा 23 तारखेलाच चौकशीला बोलवावं, तशी माझी तयारी आहे. मला अपेक्षा आहे की, ईडी ही विनंती मान्य करेल,” असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ईडीने माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना 25 जानेवारीसाठी समन्स बजावले आहे. बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांना समन्स बजावण्यात आले आहे. दुसरीकडे, रोहित पवार यांना यापूर्वीच वेगवेगळ्या प्रकरणात केंद्रीय यंत्रणांकडून नोटिसा आल्या आहेत.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp