Solapur Loksabha : आगामी लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने सोलापूर काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे. भाजप उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) यांना खरमरीत वेलकम पत्र लिहित प्रणिती शिंदेंनी (Praniti Shinde) प्रचाराचा नारळ फोडला होता. अशातच आता मी लेक सोलापूरची.. या टॅगलाईनवर प्रणिती सध्या भर देताना दिसून येत आहेत. यावेळी भाजपवर प्रणिती शिंदे या जोरदार प्रहार करतायत. भाजपने आपल्या देशाला धर्माची आणि जातीची कीड लावलीय, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी अक्कलकोट तालुक्यातील चपळगावमधील सभेत बोलताना केली. त्यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

काय म्हणाल्या प्रणिती शिंदे?

दिल्लीपर्यंत तुमचा आवाज घेऊन जाण्यासाठी मी ही लढाई लढत आहे.मागच्या 10 वर्षात सोलापूर लोकसभा मतदारसंघावर खूप मोठा अन्याय झाला आहे. मागच्या 10 वर्षात मतदारांनी सगळं भाजपला दिल.मात्र त्यांनी तुम्हाला ठेंगा दिला, भाजपने तुम्हाला धोका दिला. तुमचा विश्वासघात केला. मागच्या 10 वर्षात सोलापूरने निवडून दिलेल्या भाजपच्या खासदाराने काय काम केलं हा एकच प्रश्न त्यांना विचारा,त्यांची बोलती बंद होईल. ऐन इलेक्शनच्या तोंडावर पेट्रोलचा वाढलेला भाव फक्त 2 रुपयांनी कमी केला, म्हणजे ही लोक आपणाला भीक देतायत की काय? यांच्याकडे आमदारांना विकत घ्यायला 50 कोटी आहेत, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना रातोरात अटक करतात. जर 400 पार होणार याबद्दल तुम्हला एवढा आत्मविश्वास आहे तर एवढी भीती का आहे तुम्हला? ही लोक 400 सोडा मुश्किलने 100 च्या पण पार जाणार नाहीयेत,कारण त्यांच्याकडे तसा रिपोर्ट आहे. समोरून उज्वला योजना आणतात आणि मागून पिवळं कार्ड बंद करतात. धान्यच मिळत नसेल तर त्या सिलेंडरवरती काय शिजवायचं..? असा सवाल प्रणिती शिंदे यांनी विचारला आहे.

हाथी के दांत दिखाणे के एक और खाणे के एक, यांच्या विचारसरणीमुळे सोलापूर आज 20 वर्ष मागे गेलाय,तर आपला देश 50 वर्ष मागे गेलाय. आपल्या देशाला भाजपच्या विचारसरणीने धर्माची आणि जातीची कीड लावली आहे. धर्म आणि जातं करून लोकांमध्ये तेढ निर्माण करतायत,आधी आपण असे नव्हतो. निवडणूकीच्या वेळेस आपण सर्वधर्म समभावावर मतदान करायचो. सर्वधर्म समभाव विचारसरणी असणाऱ्या लोकांना धर्मावर मतदान करायला हे प्रवृत्त करताय. ज्या दिवशी असं व्हायला लागेल त्यादिवशी लोकशाहीलां खतरा निर्माण व्हायला लागतो. म्हणून जागे व्हा, ते फक्त गाजर दाखवत आहेत, अशी जबरी टीका प्रणिती शिंदे यांनी यावेळी केली.

मी एकमेव आहे जी विधानसभेत भाजप विरोधात बोलते. जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत आम्ही तुमचा आवाज दाबू देणार नाही. मला फक्त एकदा आशीर्वाद द्या, मग बाकी ते टेन्शन माझं. मी इडीबिडीला घाबरत नाही, असंही प्रणिती शिंदे यावेळी म्हणाल्या. मी राजकारणात टक्केवारी आणि सत्तेसाठी आलेली नाही त्यामुळे माझा त्रास तुम्हाला कधीच होणार नाही, असं आश्वासन देखील प्रणिती शिंदे यांनी दिलं आहे.

Source link