Maharashtra Weather News : हवामान विभागानं नव्या आठवड्याच्या अनुषंगानं येत्या 24 तासांसह एकंदरच पुढील तीन दिवसांपर्यंत हवामानाचे तालरंग नेमके कसे असतील याची माहिती देत नागरिकांना सतर्क केलं आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. यादरम्यान प्रतितास 30-40 किमी वेगानं वारेही वाहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यामध्येही पावसाची शक्यता असली तरीही उष्णतेचा दाह मात्र कमी होणार नाही हेसुद्धा हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.
राज्यात सध्या कोकणापासून मुंबईपर्यंत आणि मराठवाडा, मध्य महाराष्ट्रापर्यंतही तापमानाच अनेक चढउतार पाहायला मिळत आहेत. मध्य महाराष्ट्रात पारा 37 अंशांवर आला आहे, तर नवी मुंबई, रायगड, ठाण्यामध्ये तापमान 40 अंशांच्या घरात पोहोचलं आहे. दरम्यान पुढील तीन दिवस उष्णतेचा दाह अधिकाधिक प्रमाणात वाढणार असून त्यातील पहिले 48 तास अतिशय महत्त्वाचे असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. राज्यात पुढील तीन दिवसांत तापमानानं 45 अंशांचा आकडा गाठल्यास ही उष्णतेची लाट असल्याचं संबोधलं जाईल.
तापमानवाढीमुळं मानवी शरीरावर परिणाम होऊन, ज्यावेळी तापमान 37 अंशांच्याही पलिकडे जातं तेव्हा वातावरणातील उष्मा शरीर शोषून घेतं. हवामानातील तापमान आणि आर्द्रतेमुळं ही प्रक्रिया घडत असते. उदाहरणार्थ, जर तापामान 34 अंशांवर असून, आर्द्रतेचं प्रमाण 75 टक्के असेल तर तापमानाचा निर्देशांक 49 अंश हा आकडा दर्शवतो. थोडक्यात हे तापमान मानवी शरीरासाठी घातक ठरू शकते.
विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस 30-40 किमी प्रतितास वेगाे येण्याची शक्यता आहे. pic.twitter.com/KCMOXipPLp
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) April 14, 2024
पावासाळी वातावरण
सध्या राजस्थानच्या आग्नेयेपासून पश्चिम बंगालपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या भागावर त्यामुळं चक्रिय वाऱ्यांची निर्मिती होताना दिसत आहे. ज्यामुळं मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हवामान काही अंशी ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 48 तासांमध्ये देशाच्या काही राज्यांमध्ये सरासरी 4 ते 6 अंशांची तापमानवाढ अपेक्षित असल्यामुळं नागरिकांनी या स्थितीमध्ये आरोग्याची काळजी घ्यावी.