Maharashtra Weather Forecast : उन्हामुळं अंगाची लाहीलाही झाली असताना आता राज्यात पुढील 3 दिवस बहुतांशी भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता (Unseasonal Rain In Maharastra) आहे. पुणे, सातारा, नांदेड, लातूर, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. आजपासून मंगळवारपर्यंत राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याचेही भारतीय हवामान विभागाने (IMD) सांगितलं आहे. त्यामुळे आता बळीराजा संकटात आल्याचं पहायला मिळतंय. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 40-50 किमी प्रतितास वाऱ्याचा वेग राहिल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्रासह बिहार, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि लक्षद्वीपमध्ये कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय. 

मुंबई, ठाणे आणि रायगडच्या अनेक भागात येत्या रविवारपासून पाऊस आणि वादळाची शक्यता देखील हवामान विभागाच्या अंदाजानुसार वर्तविण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात पुढील दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे आता पुणेकरांना गर्मीपासून सुटका मिळणार का? असा सवाल देखील विचारला जात आहे.

दरम्यान, येत्या तीन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता असल्याने आता हातातोंडाशी आलेलं पीक गेल्याचं पहायला मिळतंय. कोकणात आंब्याला मोठा फटका बसला आहे. 





Source link