मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही, त्यात मराठवाड्यात भाजपचा मोठा पराभव झाला. मराठवाड्यातील 8 पैकी केवळ 1 जागेवर महायुतीचा उमेदवार विजयी झाला असून मराठवाड्यातील (Marathwada) भाजपच्या सर्वच उमेदवारांचा पराभव झाला. त्यामुळे, राज्यातील भाजपच्या पराभवाचा विश्लेषण करताना भाजपकडून (BJP) विविध कारणे देण्यात आली. त्यात, खोटा नेरेटीव्ह हे सर्वात महत्वाचं कारण सांगण्यात आलं. तर, मराठवाड्यातील पराभवावर अप्रत्यक्षपणे मराठा आरक्षणाचा फटका बसल्याचेही काही नेत्यांनी म्हटले. मात्र, माजी केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी थेट कबुलीच दिली. मराठवाड्यात जरांगे फॅक्टर चालला, असे म्हणत कराड यांनी मनोज जरांगेंमुळे मराठवाड्यात भाजपचा पराभव झाल्याचं म्हटलं. 

मराठवाड्यातील बहुतांश विजयी उमेदवारांनी विजयानंतर मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या उपोषणाला आपलं समर्थन दिलं. तर, बीडचे बजरंग सोनवणे आणि परभणीचे संजय (बंडू) जाधव यांनी आपल्या विजयात मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मोठा वाटा असल्याचे म्हटले. तर, दादा, तुम्ही मला खासदार केला, तुमच्यामुळेच मी खासदार झालो, असे म्हणत बजरंग सोनवणे यांनी मनोज जरांगेंचे आभारही मानले होते. आता, भाजप नेते आणि माजी केंद्रीयमंत्री भागवत कराड यांनीही स्पष्ट कबुली दिली आहे. बाकीच्या विभागात माहिती नाही, पण मराठवाड्यात महायुतीच्या पिछेहाटीसाठी जरांगे फॅक्टर कारणीभूत ठरल्याची स्पष्टोक्ती माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री आणि भाजपाचे खासदार डॉ.भागवत कराड यांनी दिली. ते अकोला येथे एका पत्रकार परिषदेत बोलत होते. लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी डॉ. कराड अकोल्यात आले होते. विधानसभा निवडणुकीआधी जरांगे आणि मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक निर्णय करणार असल्याचंही यावेळी डॉ. कराड यांनी सांगितले.

मराठवाड्यात 8 पैकी 7 जागांवर महायुतीचा पराभव

मराठवाड्यात लोकसभेच्या 8 जागांसाठी निवडणूक झाली. त्यापैकी, सर्वात महत्वाची आणि काँटे की टक्कर ठरली ती बीडमधील निवडणूक. बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे यांच्यात थेट सामना झाला. त्यामध्ये, शेवटच्या फेरीपर्यंत अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या मतमोजणीत बजरंग सोनवणे 6 हजार मतांनी विजयी झाले. तर, बाजूलाच परभणी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या महादेव जानकर यांचाही मोठा पराभव झाला. जालन्यात केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे पराभूत झाले. तर, लातूरमध्ये सुधार शृंगारे तर नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. धाराशिवमध्ये अर्चना पाटील यांचा पराभव करत ओमराजे निंबाळकर विजयी झाले. हिंगोलीत  बाबूराव कदम हेही पराभूत झाले. मराठवाड्यात केवळ छत्रपती संभाजीनगरची जागा जिंकण्यात महायुतीला यश मिळाले. संभाजीनगरमधून शिवसेना महायुतीचे संदीपान भुमरे विजयी झाले आहेत. त्यामुळे, भाजपने  लढवेलल्या चारही जागांवर भाजपा उमेदवारांचा पराभव झाला आहे. 

अधिक पाहा..Source link