अमर काणे, झी मीडिया, नागपूर : क्राईम कॅपिटल (Crime Capital) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपराजधानी नागपुरातील  रामबाग (Nagpur Rambaug) इथं आणखी एक अक्कू यादव प्रकरण (Akku Yadav Case) होण्याच्या मार्गावर असल्याचं परिसरातील संतप्त महिलांमुळे दिसून येत आहे. गावगुंडांच्या छळाला कंटाळलेल्या रामबाग वस्तीतील महिलांनी कायदा हातात घेऊन गाव गुंडांचा नायनाट आम्हीच करु असा इशारा पोलिसांना (Police) दिला आहे. ग्रेटनाग रोडवरील रामबाग वस्तीमध्ये मुली आणि महिलांची छेड काढणं, नागरिकांच्या हातातून पैसे लुटणं, हातात चाकू घेऊन रात्री सात वाजताच परिसरातील नागरिकांना धाक दाखवत घरात राहिला सांगणं, घराबाहेर ठेवलेल्या दुचाकी फोडणे, परिसरातील दुकानातून हफ्ते वसूल करणं, अशा गोष्टी वारंवार घडत आहेत. 

पोलीस स्थानकापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर गुंडाची दहशत
या गुंडाच्या त्रासला वैतागलेल्या महिलांनी ऋषिकेश वानखेडे नावाचा गावगुंड आणि त्याच्या टोळीचा बंदोबस्त लवकर करा, अन्यथा आम्हालाच कायदा हातात घेऊन त्याचा नायनाट करावा लागेल असा इशारा दिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही वस्ती स्थानिक इमामवाडा पोलीस स्टेशनपासून अवघ्या 200 ते 300 मीटर अंतरावर आहे. परिसरातील नागरिकांनी यापूर्वीही वानखेडे आणि त्याच्या टोळीविरोधात अनेक वेळा पोलिसांकडे तक्रार केल्या आहेत.

 

मात्र थातूरमातूर कारवाई होऊन हे गाव गुंड पुन्हा सुटून येतात आणि तक्रार करणाऱ्यांवर सूड घेतात. त्यामुळे आता पोलीस तक्रार न करता स्वतःचं संरक्षण स्वतःच करायचं या मानसिकतेत वस्तीतील नागरिक पोहोचले आहेत. मुलांना बाहेर खेळता येत नसेल, गाड्यांची तोडफोड होत असेलतर आम्ही जायचं कुठे सवाल इथल्या नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

2004 साली नागपुरात भर कोर्टात अक्कू यादव या गुंडांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी अक्कू यादवला कोर्टात हजर करताच शेकडो महिलांचा जमाव त्याच्यावर अक्षरश: तुटून पडला होता. महिलांना संताप इतका अनावर झाला होता की कुणी त्याचे कान कापले तर कुणी गुप्तांग…आता नागपुरात पुन्हा असाच प्रकार घडतो की काय अशी स्थिती निर्माण झालीय. 

हे ही वाचा : जुळ्या मुलींचा जन्म झाला, वडिलांनी जीव दिला… कारण वाचून बसेल धक्का

नागपूर जरी उपराजधानीचं शहर असलं तरी गेल्या काही वर्षात गुन्हेगारांमुळे नागपूरची ओळख क्राईम कॅपिटल अशीच झालीय. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक दिसून येत नाही. त्यामुळे नागपुरात आणखी एक अक्कू यादव प्रकरण होण्याची पोलीस वाट पाहतायेत का? हाच सवाल यानिमित्तानं उपस्थित होतोय. 





Source link