उद्धव ठाकरेंची साथ सोडून राज सत्तेत सहभागी होणार? 'त्या' विधानाने खळबळ; 'परफेक्ट फिगर'ही जुळणार?
Maharashtra Municipal Corporation Election: राज्यातील 29 महानगरपालिकांमधील महापौरपदासाठीच्या आरक्षणाची सोडत आज निघत असतानाच दुसरीकडे महापालिकांमध्ये कोणता पक्ष बहुमतात आहे आणि कोण या महापौरपदावर दावा सांगणार यासाठी आकड्यांची जुळवाजुळव सुरु आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये तर एकत्र निवडणूक लढणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आपलाच महापौर बसवण्यावरुन एवढी चुरस होती की अखेर शिंदेंनी ज्या राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविरुद्ध निवडणूक लढली त्यांचाच पाठिंबा घेतला आहे.
राज ठाकरेंच्या मनसेनं हा पाठिंबा दिल्याने दुसरीकडे उद्धव ठाकरे दुखावले असून राज ठाकरेंनीही खासदार संजय राऊतांशी संवाद साधताना हा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आल्याचं सांगितलं आहे. कल्याण-डोंबिवली पॅटर्नमुळे मुंबई महानगरातील 10 महानगरपालिकांमध्ये अगदी एकमेकांविरोधात लढलेल्या पक्षांचीही युती होण्याचे मार्ग मोकळे झाले आहेत की काय अशी चर्चा असतानाच आता मनसेचे नेते बाळा नांदगावकरांनाही असेच संकेत दिले आहेत.
नांदगावकर नेमकं काय म्हणाले?
पत्रकारांशी संवाद साधताना नांदगावकरांना, “कल्याण-डोंबिवलीत झालं ते मुंबईत घडणार नाही?” असा सवाल विचारण्यात आला. यावर नांदगावकरांनी, “त्यावर आता भाष्य करणं योग्य ठरणार नाही कारण राजकारणात काहीही घडू शकतं. चंद्रपूरला भाजपा आणि काँग्रेस एकत्र आहे. कोकणात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष एकत्र आहेत,” असं उत्तर दिलं.
‘ज्यांच्याविरोधात लढला त्यांच्यासोबत…’
“ज्यांच्याविरोधात लढला त्यांच्यासोबत जात आहात,” असं म्हणत पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर नांदगावकरांनी, “आम्ही कुठे गेलो त्यांच्यासोबत? तो निर्णय स्थानिक स्तरावर झाला आहे. तिथल्या नेत्याला अधिकार दिलेले तसा निर्णय त्यांनी घेतला आहे,” असं उत्तर दिलं. “कुठे कोणते निर्णय घ्यायचे यासाठी ठाकरे बंधू मुरलेले आहेत. मुंबईमध्ये काय होऊ शकतं हे मी आता सांगू शकत नाही,” असंही नांदगावकर म्हणाले.
मनसे शिंदे आणि भाजपासोबत जाणार?
नांदगावकरांनी केलेल्या विधानामुळे वेगवेगळ्या शक्यता व्यक्त केल्या जात असतानाच ठाकरेंची युती तोडून 6 जागांसहीत राज ठाकरे कल्याण-डोंबिवलीप्रमाणे सत्तेत सहभागी होण्यासाठी भाजपा आणि शिंदे सेनेला पाठिंबा देणार का अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. सध्या भाजपाकडे 89 आणि शिंदेंकडे 29 जागा आहेत. म्हणजेच बहुमतापासून युती 108 जागांसहीत अवघ्या 6 जागा दूर आहे. या सहा जागा मनसेच्या माध्यमातून मिळू शकतात.
मुंबईतील संख्याबळाची स्थिती काय?
भारतीय जनता पक्ष (BJP): 89 जागा (सर्वात मोठा पक्ष)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे – UBT): 65 जागा (एका बंडखोरीमुळे संख्या 64 वर)
शिवसेना (एकनाथ शिंदे गट): 29 जागा
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (Congress): 24 जागा
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS): 6 जागा
एआयएमआयएम (AIMIM) – 8 जागा
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) – 3 जागा
समाजवादी पक्ष (SP)- 2 जागा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – 1 जागा
मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी एकूण 227 पैकी 114 जागांची गरज आहे.