Maharashtra Municipal Election : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत 227 प्रभागासाठी तब्बल 1700 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या माजी महापौरांसह माजी नगरसेवकांनी आपले प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत. यात विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून माजी महापौर व माजी नगरसेवक कोट्याधीश असल्याची माहिती उजेडात आली आहे. यात अनेकांच्या संपत्तीत दुपटीने ते पाच पटीने वाढ झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरलेले उमेदवार गडगंज असल्याची माहिती उघडकीस आली आहे.
शिवसेना शिंदे गटातील उमेदवार समाधान सरवणकर यांची सद्याची एकूण स्थावर व जंगम मालमत्ता तब्बल 46 कोटी 59 लाख रुपये आहे. त्यांची 2017 ला 9 कोटी 43 लाख रुपये होती. ते व्य़ावसायिक आहेत. शिवसेना (ठाकरे) गटाच्या श्रदधा जाधव यांची मालमत्ता 46 कोटी रुपये होती. त्यांची 2024 ला 44 कोटी रुपये मालमत्ता होती म्हणजे एका वर्षात साडेतीन कोटीने वाढली आहे.
Add Zee News as a Preferred Source
भाजपचे उमेदवार प्रभाकर शिंदे यांची सध्याची संपत्ती 17 कोटी 63 लाख रुपये आहे. तर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची 5 कोटी 26 लाख रुपये आहे. 2017 साली 1 कोटी 61 लाख 53 हजार रुपये होती. तर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे उमेदवार शैलेश फणसे यांची स्थावर व जंगम मालमत्ता तब्बल 25 कोटी रुपये एवढी आहे. शिवसेना (शिंदे) पक्षातील दिप्ती वायकर यांची संपत्ती 22 कोटी 1 लाख 71 हजार इतकी आहे. तर काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले उमेदवार रवी राजा यांची स्थावर व जंगम मालमत्ता सद्याची मालमत्ता 10 कोटी 12 लाख 17 हजार इतकी आहे. 2017 साली ती 5 कोटी 12 लाख 84 हजार इतकी होती. म्हणजे 8 वर्षात दुपटीने वाढली आहे.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवारांना स्वतःची, पत्नीची तसेच अवलंबितांची स्थावर व जंगम मालमत्ता, बँक ठेवी, शेअर्स, दागिने आणि कर्जाची माहिती जाहीर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांत काही माजी नगरसेवकांच्या मालमत्तेत कोट्यवधी रुपयांची वाढ झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. घर, फ्लॅट, व्यावसायिक गाळे, भूखंड यासह बँक ठेवी आणि गुंतवणुकीत वाढ झाल्याची नोंद आहे. काही माजी नगरसेवकांनी उत्पन्नाचे स्रोत व्यवसाय, शेती, भाडे उत्पन्न आणि पगार असल्याचे नमूद केले असले तरी, मालमत्तेतील झपाट्याने झालेली वाढ मतदारांच्या कुतूहलाचा विषय ठरत आहे.
‘या’ जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार
मुंबईत गडगंज श्रीमंत उमेदवार असले तरी पुण्यातील श्रीमंत उमेदवारांसह बरोबरी करु शकत नाही. पुण्यात 41 जागांसाठी 1166 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजप उमेदवार सुरेंद्र पठारे हे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 271.85 कोटींच्या आसपास आहे. तर, सायली वांजळे या दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांची संपत्ती 77.12 कोटींच्या आसपास आहे.
मुंबईत कोणाची किती संपत्ती वाढली
माजी महापौर किशोरी पेडणेकर एकूण मालमत्ता – यांची 5 कोटी 26 लाख
2017 साली – 1 कोटी 61 लाख 53 हजार रुपये होती.
माजी महापौर श्रद्धा जाधव (वॉर्ड क्रमांक 202)
एकूण स्थावर आणि जंगम मालमत्ता : 46 कोटी
विधानसभा निवडणूक 2024 लढवली होती. त्यावेळी एकूण मालमत्ता 44 कोटी होती
वाढ : एका वर्षात 2 कोटी
माजी महापौर विशाखा शरद राऊत (प्रभाग क्र. 191)
स्थावर – जंगम मालमत्ता: 21 कोटी 83 लाख
2017 मध्ये : 14 कोटी 37 लाख
वाढ : 7 कोटी
यामिनी जाधव (प्रभाग 209)
एकूण मालमत्ता : 14 कोटी 57 लाख
विधानसभा 2024 लढवली : 10 कोटी 10 लाख
वाढ : 1 वर्षात 4 कोटी
नील किरीट सोमय्या (प्रभाग क्र. 107)
एकूण मालमत्ता : 9 कोटी
२०१७ मध्ये : 1 कोटी 99 लाख
वाढ : 8 वर्षात 7 कोटी
तेजस्वी अभिषेक घोसाळकर (प्रभाग क्र. 2)
एकूण मालमत्ता : 5 कोटी
२०१७ मध्ये : 25 लाख
वाढ : 8 वर्षात 4. 75 कोटी
शैलेश फणसे – एकूण मालमत्ता 25 कोटी
दीप्ती वायकर – 22 कोटी 1 लाख 71 हजार
समाधान सरवणकर – 46 कोटी 59 लाख
2017 मध्ये – 9 कोटी 43 लाख
यशवंत किल्लेदार एकूण मालमत्ता – 7 कोटी 5 लाख
रवी राजा एकूण मालमत्ता – 10 कोटी 12 लाख 17 हजार
2017 मध्ये – 5 कोटी 12 लाख 84 हजार
भाजपचे उमेदवार प्रभाकर शिंदे एकूण मालमत्ता – 17 कोटी 63 लाख रुपये